Home    Go to English Website  
   जय महाराष्ट्र! > महाराष्ट्राविषयी विशेष > नाटक
महाराष्ट्राविषयी विशेष
आपले जिल्हे आपला महाराष्ट्र
ह्यांनी घडविला महाराष्ट्र

 

(भाग १) | (भाग २) | (भाग ३)

मराठी नाटकांची परंपरा :

नाटक’ हा वाङ्मयप्रकार म्हणजे भारतीय संस्कृतीचे अत्यंत उज्ज्वल आणि भूषणावह असे अंग समजले जाते. इ.स. १८४३ मध्ये विष्णुदास भावे यांच्या ‘सीतास्वयंवर’ या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग झाला. त्यानंतर मराठी नाट्यकलेला आत्मविश्र्वासाने आणि कलापूर्ण रीतीने उभे राहाण्यास तब्बल तीन तपे जावी लागली. विष्णुदास भावे यांनाच सांगली परिसरातून केलेल्या `पहिल्या' प्रयत्नांमुळे `मराठी नाटकाचे जनक' म्हटले जाते.

इ.स. १८८० मध्ये अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या ‘शाकुंतल’ नाटकाचा प्रयोग झाला आणि खर्‍या अर्थाने मराठी नाट्यपरंपरा सुरु झाली. संस्कृत आणि इंग्रजीमधील नाटकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तत्कालीन नाटककारांनी नाटके लिहिली. विनायक जनार्दन कीर्तने यांचे ‘थोरले माधवराव पेशवे’ (१८६१) हे मराठीतील पहिले स्वतंत्र ऐतिहासिक नाटक. ‘जयपाळ’ (१८६५) हे कीर्तने यांचे दुसरे नाटक. मानवी स्वभावाचे व संसारात नित्य आढळणार्‍या संबंधांचे प्रेमळ चित्रण या नाटकात आहे. त्यातूनच पुढे ‘झाशीच्या राणीचे नाटक’ (१८७०), सवाई माधवरावांचे नाटक (१८७१), अफझलखानाच्या मृत्यूचे नाटक (१८७१), मल्हारराव महराज नाटक (१८७५) इत्यादी नाटकांची निर्मिती झाली.

फार्स - सामाजिक नाटकांचे अग्रदूत :
विष्णुदास भावे यांच्या , पौराणिक नाटकांबरोबरच भोवतालच्या समाजाचे विनोदाच्या अंगाने दर्शन घडवणारे फार्सही करण्यात येऊ लागले. ढोंगी बैराग्याचे फार्स, कुटिल कृत्यादर्श प्रहसन, बासुंदीपुरीचा फार्स, खापर्‍या चोराचे प्रहसन, पुनर्विवाह दु:खदर्शन, हुंडा प्रहसन ही तत्कालीन फार्स वा प्रहसनांची नावे जरी वाचली तरी त्यावरून त्यांच्या अंतरंगाची कल्पना येते. त्यावेळी होत असलेल्या सामाजिक सुधारणांची तरफदारी किंवा चेष्टा या फार्समधून विनोदी पद्धतीने केलेली दिसते. सामाजिक नाटकांच्या निर्मितीला आणि विकासाला पोषक अशी भूमिका या प्रहसनांनी तयार केली. मात्र नंतरच्या काळात किर्लोस्करी संगीत नाटकांच्या प्रभावापुढे प्रहसनांची परंपरा टिकू शकली नाही.

संगीत शाकुंतल - पुण्यात ३१ ऑक्टोबर १८८० रोजी किर्लोस्करांच्या `संगीत शाकुंतल' या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. मराठी नाट्यकलेतील `परिवर्तन पर्वाचा' तो प्रारंभ होता. मराठी रंगभूमीच्या इतिहासातील तो अत्यंत क्रांतिकारक असा दिवस होता. प्रयोगापूर्वीच सर्व तिकिटांचा खप झाला. ‘आनंदोद्भव’ हे नाट्यगृह रसिकांनी फुलून गेले. प्रत्येक अंक मागील अंकाहून अधिक सरस झाला. त्यानंतर ‘संगीत सौभद्र’, ‘रामराज्यविरोग’, ही नाटके किर्लोस्करांनी लिहिली आणि रंगमंचावर आणली. त्यांच्या अभिजात रसिकतेमुळे, कल्पकतेमुळे आणि कुशल संघटनेमुळे मराठी नाटक आणि रंगभूमी यांना स्थैर्य प्राप्त झाले.

इ. स. १८८५ ते १९२० हा कालखंड नाट्यवाङ्मयाच्या दृष्टीने मोठा भाग्याचा आणि वैभवशाली असा कालखंड आहे. थोर आणि प्रतिभाशाली नाटककारांचे कर्तृत्व या काळात साकार झाले. त्यामधील पहिले नाव आहे गोविंद बल्लाळ देवल यांचे. ‘एका दिवसाची चुकामूक’ अथवा ‘दुर्गा’ (१८८६), ‘विक्रमोर्वशीय’ (१८८९), मृच्छकटिक (१८८९), झुंझारराव (१८९०), फाल्गुनराव अथवा तरबिरीचा घोटाळा (१८९३) त्याचेच पुढे केले संगीत संशयकल्लोळ हे रुपांतर शापसंभ्रम (१८९३) आणि संगीत शारदा (१८९९) या सात नाटकांतून देवलांनी आपले नाट्यकर्तृत्व सिद्ध केले. मराठीतील सामाजिक नाटकाचे जनक - अशी पदवी मिळवून देणारे त्यांचे ‘शारदा’ हे मराठीतील पहिले सामाजिक नाटक! त्यातील पुरोगामित्वाचे नाणे खणखणीत आहे. कलात्मकता अव्वळ दर्जाची आहे. साधेच पण सहेतुक आणि नाट्यपूर्ण प्रसंगांनी युक्त असे शारदेचे कथानक आहे. पुरोगामी विचारसरणीच्या प्रभावी सामाजिक नाटकाची मुहूर्तमेढ देवलांनी रोवली.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर :
देवलांनंतर मराठी नाट्यवाङ्मयात मन्वंतर घडवून आणले ते कोल्हटकरांनी! शेक्सपिअर, मोलिअर या पाश्र्चात्य नाटककारांची छाप त्यांच्या नाटकांवर दिसून येते. ‘वीरतनय’ (१८९४), मूकनायक (१८९७), गुप्तमंजूस (१९०१), मतिविकार(१९०६), प्रेमशोधन(१९०८), वधूपरीक्षा (१९१२), सहचारिणी(१९१७), परिवर्तन (१९१७), जन्मरहस्य(१९१८), शिवपावित्र्य (१९२१), श्रमसाफल्य (१९२८) आणि मायविवाह (१९२८) अशी बारा नाटके त्यांनी लिहिली. वैविध्य हा त्यांच्या नाटकांचा विशेष होय. स्वतंत्र कल्पनारम्य कथानकावर आधरलेली, रहस्यमय आणि चमत्कृतिपूर्ण प्रसंगांची निर्मिती, कोटिबाज, खटकेबाज संवाद आणि मराठी रंगभूमीवर अगदीच नवीन असणारी पारशी-गुजराती चालीची पदे यांमुळे कोल्हटकरांच्या नाटकांनी मराठी नाट्यरसिकाला आकर्षून घेतले. भाऊराव कोल्हटकरांसारख्या स्वर्गीय गळ्याच्या गायक नटांनी त्यांच्या सुरुवातीच्या नाटकांतून काम केल्यामुळे त्यांच्या नाटकांना अमाप लोकप्रियता लाभली.

नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर :
ध्येयासक्तीतून निर्माण झालेल्या खाडिलकरांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीचे सौंदर्य आणि सामर्थ्य वाढवले. स्वराज्य संपादनाचा दिव्य संदेश देणार्‍या एका काल्पनिक प्रतापरावाचे करुणगंभीर जीवनचित्र साकार करणारे ‘कांचनगड ची मोहना’ हे नाटक त्यांनी १८९७ मध्ये लिहिले. ‘बायकांचे बंड’, कर्छनशाहीविरुद्ध लोकमत तयार करणारे ‘कीचकवध’ हे नाटक त्यांनी लिहिले. ‘कीचकवध’ या नाटकाचा परिणाम इतका प्रभावशाली होता की १९१० साली म्हणजे ‘कीचकवधा’ चा पहिला प्रयोग झाल्यावर अवघ्या तीनच वर्षांनी त्या नाटकावर सरकारने बंदी आणली. ‘भाऊबंदकी’, ‘मानापमान’, ‘प्रेमध्वज’, ‘विद्याहरण’, ‘सत्त्वपरीक्षा’, ही नाटके तर गाजलीच पण १९१६ मध्ये रंगभूमीवर आलेल्या त्यांच्या `स्वयंवर’ या नाटकाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला! त्यानंतर ‘द्रौपदी’, ‘मेनका’, ‘सवतीमत्सर’, ‘सावित्री’ आणि ‘त्रिदंडी संन्यास’ अशी नाटके त्यांनी लिहिली. त्यांनी आपल्या नाटकातून तेजस्वी जीवनदृष्टीचा प्रत्यय दिला. त्यांच्या नाटकांतील प्रमुख पात्रांच्या व्यक्तिचित्रणांतून वीररसाचा अत्यंत उदात्त आणि स्फूर्तिदायक आविष्कार घडतो.

राम गणेश गडकरी :
श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना गुरुस्थानी मानणार्‍या गडकर्‍यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या नाटकांकरता स्वतंत्र कथानके रचली. ‘वेड्यांचा बाजार’ हे त्यांचे पहिले नाटक. ‘गर्वनिर्वाण’ या नाटकानंतर त्यांनी ‘राजसंन्यास’ लिहिले. संभाजीराजांच्या जीवनावरील हे नाटक अपूर्ण आहे. ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’ आणि ‘भावबंधन’ ही गडकर्‍यांची चार पूर्ण नाटके. या सर्वच नाटकांतून करुणरसाचा उत्कट आविष्कार त्यांनी घडवला. त्यांच्या नाटकांतील सर्वच प्रमुख पात्रांचे जीवन कारुण्याने व्यापले आहे. त्यांची विलक्षण कल्पकता, चमकदार भाषा वाचकांना स्तिमित करुन टाकते. केवळ सात-आठ वर्षांच्या वाङ्मयीन कर्तबगारीच्या बळावर गडकरी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनले! चमत्कृतीचे, उत्कटतेचे आणि भव्यतेचे गडकरी उपासक होते. ती त्यांच्या वाङ्मयातील आशयातून जशी प्रकटते तशीच त्यांच्या भाषेतूनही प्रकटते.

‘संन्यस्त खङ्ग’, ‘उत्तरक्रिया’, ‘उ:शाप’ ही वि. दा. सावरकर यांची नाटके विशेषकरुन सामाजिक, राजकीय प्रश्र्नांसंबंधी मूलगामी विचार प्रकट करतात. सावरकरांची विलक्षण तेजस्वी भाषा, त्यांचा जिवंत आवेश यांचे प्रत्ययकारी दर्शन त्यांच्या इतर साहित्याप्रमाणेच त्यांच्या नाटकांतूनही घडते. न. चि. केळकर यांनी ‘नवरदेवांची जोडगोळी’, ‘कृष्णार्जुन युद्ध’ इत्यादी नऊ नाटके लिहिली.

भा. वि. वरेरकर, यांचे नाट्यलेखन १९१४ मध्ये सुरु झाले. आणि १९६० पर्यंत ते नाटके लिहित होते. त्यामुळे वरेरकरांच्या नाटकांतून रंगभूमीवरील स्थित्यंतरांचा एक आलेख रेखाटता येतो. ‘हाच मुलाचा बाप’ (१९१६) या नाटकापासून खर्‍या अर्थाने त्यांचे नाट्यलेखन सुरु झाले. ‘संन्याशाचा संसार’ (१९१९), ‘तुरुंगाच्या दारात’ (१९२३), ‘सत्तेचे गुलाम’ (१९२७) इत्यादी नाटकांतून त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले. ‘भूमिकन्या सीता’ (१९५०) या नाटकातून वरेरकरांची नवी दृष्टी प्रतीत होते. सीतेचे काही मानसशास्त्रीय गुंतागुंतीचे धागे उलगडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री-पुरुषसंबंध राजा-प्रजा संबंध, स्त्रीस्वातंत्र्यबद्दलचे विचार हे सगळे प्रश्र्न त्यांनी या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न केला.

‘नाट्यमन्वंतर’ आणि ‘आंधळ्यांची शाळा’
१९२५ नंतर नाट्यव्यवसायाला एक प्रकारची मंदी, एक प्रकारची चैतन्यहीनता येऊ लागली. १९२७ मध्ये ‘रेडिओ’ हे नवे माध्यम सुरु झाले .बोलपटांची निर्मिती वेग घेऊ लागली. अशा वातावरणात पाश्र्चात्य रंगभूमीवरील प्रगतीचे भान नाट्यवेड्या सुशिक्षितांना येऊ लागले. जागातिक स्तरावरील रंगभूमीवरील नव्या जारिवांनी प्रेरित होऊन के.ना.काळे, अनंत काणेकर, ग.य.चिटणीस, श्री.वि. वर्तक या मंडळींनी ‘नाट्यमन्वंतर’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली. (१९३३) वर्तकांचे ‘आंधळ्याची शाळा’ हे नाटक रंगभूमीवर आले. अभिनय, नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना या घटकांचे नवे वास्तवाभिमुख दर्शन या नाटकाने घडवले. दोनच वर्षात तात्त्विक मतभेदांमुळे ही संस्था जरी बंद पडली तरी तिने चालू केलेली परंपरा पुढे अत्रे, आळतेकर यांच्या काही नाटकांनी सुरु ठेवली. पौराणिक कथेचा नवा अन्वयार्थ लावणारे विश्राम बेडेकर यांचे ‘ब्रह्मकुमारी’ हे नाटकही याच काळातले.

आचार्य प्र. के. अत्रे :

इ. स. १९३३ ते १९४३ हा मराठी रंगभूमीवरील ‘अत्रे कालखंड’ होय. ‘साष्टांग नमस्कार’ या विनोदी नाटकाने अत्र्यांना एका रात्रीत नाटककार म्हणून नाव मिळवून दिले. या नाटकात छंदिष्ट माणसांचे एक जगच त्यांनी साकारले. मानवी स्वभावाच्या मूलभूत वृत्ती-प्रवृत्तींचे ते विडंबन असल्यामुळे केवळ उच्च प्रतीची सुखात्मिका एवढेच या नाटकाचे महत्त्व नसून या नाटकाला परंपरेला एक नवे वळण देण्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे स्थान आहे. ‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पराचा कावळा’, `तो मी नव्हेच!'  इत्यादी नंतरच्या नाटकांतून त्यांनी पात्रचित्रण, प्रसंग निर्मिती, संवाद यांचे कौशल्य सिद्ध केले. संपूर्ण प्रहसनात्मक अशा विनोदी नाटकांना त्यांनी सामाजिक दर्जा मिळवून दिला.

मो. ग. रांगणेकर :
‘नाट्यनिकेतन’ या आपल्या संस्थेची स्थापना करुन रांगणेकरांनी स्वत:ची नाटके रंगमंचावर आणली. आपल्या नाटकांतून त्यांनी मध्यमवर्गीय मराठी माणसाला जवळचे वाटणारे विषय मांडले. ‘आशीर्वाद’ नाटकातून मिळवत्या मुलीचा प्रश्र्न किंवा ‘कुलवधू’ नाटकातून कलावंत स्त्रीचा प्रश्र्न त्यांनी मांडला. प्रेक्षकांची संगीताची बदललेली अभिरुची लक्षात घेऊन सिनेगीतांच्या धर्तीची भावगीतात्मक पाच-सहा गाणी त्यांनी आपल्या नाटकांत आवर्जून घातली. सुबोधता आणि गेयता ही त्यांच्या नाट्यगीतांची वैशिष्ट्ये असल्यामुळे पारंपरिक नाट्यसंगीतापेक्षा ती वेगळी ठरली व चटकन लोकप्रिय झाली. वास्तववादी नेपथ्य, खटकेबाज संवाद, खेळकर शैली यांमुळे त्यांची नाटके त्या काळात गाजली. ‘माझे घर’, ‘कन्यादान’, ‘वहिनी’, इ. नाटकांनी त्या काळात नाव मिळवले.

वि. वा. शिवाडकर यांच्या नाट्यलेखनाचा पहिला कालखंड १९४७ ते १९५४ असा आहे. ‘दुसरा पेशवा’, ‘वैजयंती’, ‘कौंतेय’ आणि शेक्सपिअरच्या मॅकबेथचे रुपांतर ‘राजमुकुट’ ही त्यांची या कालखंडातील नाटके एका बाजूने खाडिलकरांच्या भव्य आणि तत्त्वनिष्ठ दृष्टिकोनाचा प्रभाव या नाटकांवर दिसतो तर नाट्यरचनेच्या संदर्भात ही नाटके आधुनिकतेचा आविष्कार करतात. त्यामुळे मराठी अभिजात नाटकाची परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील दुवा म्हणून शिरवाडकरांची ही नाटके महत्त्वाची ठरतात. पु. ल. देशपांडे यांची ‘तुका म्हणे आता’ (१९४८), अंमलदार (१९५२) आणि भाग्यवान (१९५३), तुझे आहे तुजपाशी (१९५७) ही नाटकेही याच काळात रंगमंचावर आली. ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक अतिशय यशस्वी ठरले. (आजही त्याचे प्रयोग होत असतात.) या नाटकात अनेक सांस्कृतिक धागे गुंफलेले आहेत. तसेच विलोभनीय व्यक्तिरेखा, नेपथ्य, नाट्यसंवाद, प्रहसनात्मक प्रसंग अशा घटकांमुळे नाटक समृद्ध झाले असा अभिप्राय पुष्पा भावे यांनी व्यक्त केला आहे.

बबन प्रभू यांच्या ‘झोपी गेलेला जागा झाला’ (१९५८), दिनूच्या सासूबाई राधाबाई (१९६०) या ‘फार्स’ चाही हाच काळ. दैनंदिन तर्काला तिरकस छेद देत, मुक्त अभिनयशैलीतून हे ‘फार्स’ रंगभूमी लवचीक होण्यासाठी सहायभूत ठरले.

(भाग १) | (भाग २) | (भाग ३)

  

 इतिहास | भूगोल | महाराष्ट्रातील शेती | उद्योग | तीर्थक्षेत्रे | पर्यटन स्थळे | मराठी भाषेचा इतिहास | साहित्य | संगीत | नाटक | चित्रपट | चित्रकला | शिल्पकला | लोककला | सण - उत्सव | महाराष्ट्र गीते | आपले जिल्हे आपला महाराष्ट्र | ह्यांनी घडविला महाराष्ट्र |