Home    Go to English Website  
   जय महाराष्ट्र! > महाराष्ट्राविषयी विशेष > साहित्य > मराठी कविता
महाराष्ट्राविषयी विशेष
आपले जिल्हे आपला महाराष्ट्र
ह्यांनी घडविला महाराष्ट्र

 

मराठी कविता :

प्राचीन कालखंडापासून ते आधुनिक कालखंडापर्यंत (इ.स.२०००) मराठी कवितेची वाटचाल कशी होत गेली, कोण कोणती नवी वळणे, नवी रुपे तिने धारण केली, आणि त्या प्रत्येक कालखंडामध्ये कोणकोणते मुख्य कवी निर्माण झाले, त्यांच्या कवितेने मराठी कवितेचा आशय आणि अभिव्यक्ती कशी बदलत गेली याचे विहंगमावलोकन प्रस्तुत लेखात केलेले आहे. आत्तापर्यंत `मराठी' तून लिहिणारे दोन कवी -कुसुमाग्रज व विंदा करंदीकर यांना साहित्य प्रांतातील, भारतातील सर्वोच्च पुरस्कार `ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त झालेला आहे. मराठी कविता वैयक्तिक आहे, सामाजिक व राष्ट्रीय आहे, तसेच ती वैश्विकही आहे. वैयक्तिक अनुभव, सुख-दु:खे, मराठी बाणा, देशभक्ती, सामाजिकता इत्यादी सर्व क्षेत्रांना व्यापणारी अशी मराठी कविता आहे. कवींची अभिव्यक्ती तसेच रसिकांना विविध प्रेरणा व आनंद ही दोन्ही उद्दिष्टे लक्षणीयरीत्या साधणारी कविता म्हणजे मराठी कविता होय.

(कवितेचा एकूण कालखंडाचा आवाका प्रचंड आहे आणि लेखाची एकंदर स्थलमर्यादा लक्षात घेता अनेक कवींचा उल्लेख राहुन गेलेला असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. परंतु उल्लेख न केलेले कवी देखील महत्त्वाचे असू शकतात याचे भान नक्कीच आहे! अधिकाधिक सर्वस्पर्शी माहिती देण्याचा प्रयत्न आहे.)

मराठी कवितेचा इतिहास :

वास्ताविक मराठी वाङ्मयाचा इतिहास प्राचीन नसुन मध्ययुगीन म्हणावयास हवा. मराठी भाषेचा गौरव सर्वप्रथम जर कोणी केला असेल तर तो एक पोर्तुगीज माणसाने, ही घटना निश्चितच उल्लेखनीय म्हणावी लागेल.

भारताच्या सुवर्णभूमीचे आकर्षण वाटून इ.स.१४७८ साली वास्को -द-गामा व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये आला आणि भारताचे प्राक्तन बदलून गेले. १५६७ पासुन ख्रिस्ती धर्मप्रचाराचे धोरण ठरविण्यासाठी धर्मपरिषदा भरु लागल्या. नव्या धर्माविषयी मराठी माणसाला प्रेम वाटावे आणि भक्तिकथा सरयुक्त मराठी पुराणांना पर्यायी अशी रचना असावी म्हणुन फादर स्टीफन्स या परकीय धर्मप्रसारकानी येशु ख्रिस्ताची महती सांगणारा ‘ख्रिस्तपुराण’ हा ग्रंथ मराठी भाषेत लिहुन महराष्ट्र सारस्वतामध्ये मानाचे स्थान मिळविले.

मुकुंदराज : मराठीचे आद्यकवी

मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधु’ हा मराठी मधील पहिला ग्रंथ इ.स. ११८८ मध्ये लिहिला गेला. त्या काळामध्ये सर्व प्रकारचे शास्त्रीय, ज्ञानात्मक विवेजन हे संस्कृत भाषेमध्ये होत असे. मराठी सारख्या देशी भाषेतुन ग्रंथ लिहिण्याची प्रथाच नव्हती. त्यामुळे संस्कृत भाषेमध्ये जे अपरंपार ज्ञानभांडार होते, त्यापासून मराठी सामान्यजन वंचित रहात होता. हे ज्ञानभांडार मराठीमध्ये आणणे आवश्यक आहे हे मुकुंदराजांनी ओळखले. आणि म्हणून तत्कालीन सर्व संकेत बाजुला ठेऊन मुकुंदराजांनी आपला ग्रंथ मराठीमध्ये लिहिला. मुकुंदराजांच्या या कृतीनंतर अठराव्या शतकापर्यंत सर्व प्रमुख कवींनी आणि ग्रंथकारांनी मराठी भाषेत कवित्व तसेच तात्विक विवेचन करण्याचे धाडस आणि समर्थन केले आहे. असे असले तरी वैदिक संस्कृतीचा मराठी संस्कृतीशी प्रथम सांधा जुळविला तो मुकुंदराजांनी!

चक्रधरस्वामी आणि त्यांचा महानुभावपंथ
बाराव्या शतकाच्या अखेरीस मुकुंदराजांनी जे कार्य केले ते तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात महानुभाव पंथाने अतिशय नेटाने पुढे नेले. ‘संस्कृत हीच ज्ञानभाषा आहे' हा संकेत महानुभाव पंथानेही धुडकावून दिला. आणि ज्ञानाभिव्यक्तिचे सुलभ साधन म्हणून मराठी भाषेचा गौरवाने स्विकार केला.

महानुभाव लेखकांचे सात ग्रंथ ‘साती ग्रंथ’ म्हणुन प्रसिद्ध आहेत.
१. शिशुपाल वध                  - शक ११९५   - कवी भास्करभट बोरीकर
२. एकादशस्कंध                  - शक ११९६   - कवीश्वर भास्कर
३. वत्सहरण                      - शक १२००   - दामोदरपंडित
४. रुक्मिणीस्वयंवर              - शक १२१०   - कवी नरेंद्र
५. ज्ञानबोध                        - शक १२५४   - विश्वनाथ बाळापूरकर
६. सह्याद्रिवर्णन                   - शक १२५४   - खळो व्यास
७. ऋद्धपुरवर्णन                   - शक १२८५   - नारायण पंडित

आद्य कवयित्री ‘महादंबा’
महानुभाव पंथातील महदंबाकृत ‘धवळे’ हे एक रसाळ काव्य आहे. या काव्यामुळे महदंबेकडे आद्यकवयित्रीचा मान जातो.
महानुभाव पंथातील या लेखकांनी व कवींनी मराठी भाषेचे ऐश्वर्य व सामर्थ्य वाढविण्याचे काम केलेले आहे. त्यांनी बाळगलेला मराठी भाषेचा अभिमान हा मराठी भाषेवर मोठे उपकारच म्हणावे लागेल.

संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी केलेला मराठी भाषेचा गौरव
मराठी भाषेचा अतिशय ज्वलंत अभिमान आणि उत्कट प्रेम ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्र्वरीमध्ये’ जागोजागी व्यक्त केलेला. आपली मराठी भाषा ही प्रौढ व रसाळ आहे ह्याची सार्थ जाणीव त्यांना आहे.

‘‘माझा मर्‍हाठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातेंहि पैजासि जिंके।
  ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन’’

अशा शब्दात त्यांनी मराठीचा गौरव केला आहे. आद्यकवी मुकुंदराज आणि ज्ञानेश्र्वर महराज यांच्यामध्ये एका शतकाचे अंतर आहे. दोघांचाही संप्रदाय व तत्त्वज्ञान एकच आहे. (नाट्यसंप्रदाय) या दोघांनीही अद्वैत सिद्धांताचा मराठी भाषेत प्रसार केला. संस्कृत भाषेचे जसे एक अंगभूत लावण्य आहे तसेच मराठी भाषेचेही अंगभूत लावण्य आहे हे ज्ञानेश्र्वर महाराजांनी ‘ज्ञानेश्र्वरी’ या ग्रंथातून दाखवून दिले. श्रीगुरु, कृष्णार्जुन, गीता, संत, मराठीभाषा, भक्तिज्ञानावैराग्य या सर्वांविषयी उत्कट प्रेमभावना ज्ञानेश्र्वरी या ग्रंथात आहे. विश्वाच्या वाङ्मयात हा ग्रंथ थोर समजला जातो.

संत नामदेव
वारकरी संप्रदायामध्ये संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त म्हणुन लोकप्रिय होते. अत्युत्कट भक्तिप्रेमाने ओथंबलेली अभंगराचना त्यांनी केली. या भक्तिभावाच्या जोरावर त्यांनी ज्ञानदेवांचे व समकालीन संतमंडळींचे प्रेम जिंकले. नामदेवांची सर्व रचना स्फुट अभंगाची आहे.

वारकरी संप्रदायातील संतकवींच्या काव्याचे स्वरूप

आपल्याकडे ‘भावकविता’ हा शब्दप्रयोग, आधुनिक कवितेच्या संदर्भात मुख्यत: वापरला जातो. परंतु याचा अर्थ असा नाही की पुर्वी भावकविताच नव्हती. संतांच्या काव्यात ओवी, अभंग, गौळणी, पदे, लोकगीते, विराण्या, पाळणे, भूपाळ्या, लावण्या अशा विविध स्वरुपात भावकविताच अविष्कृत झालेली आहे. अशी विशुद्ध भावकविता लिहिणारे संत कवी म्हणून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत एकनाथ, संत चोखामेळा, समर्थ रामदास इत्यादी सर्वच संतांचा उल्लेख करायलाच हवा.

संत कवयित्री
मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळा, भागु आणि कान्होपात्र या संतकवयित्रिंनी आपल्या भावसंपन्न कवितेने मराठी कविता समृद्ध केली.
मुक्ताबाईंचे ‘मुंगी उडाली आकाशी’ तिने गिळिले सुर्याशी’ हा कूटरचनापर अभंग किंवा त्यांचे
‘मजवरी दया करा। ताटी उघडा ज्ञानेश्र्वरा’ हे ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत.
जनाबाईंनी ‘विठो माझा लेकुरवाळा। संगे लेकुरांचा मेळा।’
असे वारकरी संप्रदायाचे हृदयंगम चित्र रेखाटले. त्यांच्या
डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी’
हा अभंग अतिशय प्रक्षोभक, स्त्रीजाणिवेचा आदय हुंकार म्हणावा लागेल.
सोयराबाईंचा ‘रंगी रंगला श्रीरंग। अवघा रंग एक झाला’ हा अभंग आजही अवीट गोडीने ऐकला जातो. संत कवयित्रींच्या काव्यरचनेमध्ये वेगवेगळे आकृतिबंध दिसतात. पुढील काळातील कवयित्रींनाही ते मार्गदर्शक ठरते आहे.

पंडिती काव्य :

तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील शेवटचे कवी मानले जातात. त्यापुढील कालखंडात म्हणजे १६५० ते १८०० पंडिती काव्य निर्माण झाले. या कालखंडाला वामन-मोरोपंतांचा कालखंड म्हटले जाते. या कालखंडाने मराठीच्या भांडारात अपार भर घातलेली आहे. मध्वमुनीश्वर, अमृतराय, महिपति, वामनपंहित, मोरोपंत हे महत्त्वाचे कवी या कालखंडात झाले. या कवींनी फक्त निवृत्तीपर रचना केली नसुन प्रवृत्ती-निवृत्ती यांचा मिलाफ त्यांच्यामध्ये झालेला आहे. या काळातील काव्य वैराग्याकडून संसाराकडे वळत चाललेले दिसते. पुढे शाहिरी काव्याने तर शृंगार रसाचा कळस गाठला.

शाहिरी काव्य :

शाहिरी काव्य म्हटले की पोवाडे आणि लावण्या हे दोन रचना प्रकार चटकन डोळ्यासमोर येतात. पोवाडा आणि लावणी यांचे मुळ अस्सल ‘मर्‍हाटी’ आहे. शाहिरी वाङ्मयाची सुरुवात शिवकालात झाली आणि नाट्य, नृत्य, संगीत या अंगाने तिचा विकास पेशवाईत झाला. मुख्यत: जनसमुदायाच्या रंजनासाठी म्हणुन लावणी, पोवाडे रचले नि गायले गेले. मन्मथस्वामी, ज्योतीराम, प्रभाकर, होनाजी बाळा, सगनभाऊ, परशराम, रामजोशी हे त्या काळातील महत्त्वाचे शाहिरी कवी होत.
प्राचीन मराठी काव्याचा हा इतिहास पाहिला तर तो संत, पंत आणि तंत अशा कवींच्या कामगिरीवर विभागलेला आहे. पहिल्या कालखंडाने अध्यात्माची व निवृत्तीची शिकवण दिली. पुढील कालखंडात माहपती मुक्तेश्वर, श्रीधर यांनी आपल्या रसाळ ग्रंथांनी मराठी भाषा जोपासली, वाढविली आणि तिसर्‍या कालखंडात ती अधिक तरुण बनली. विविध रस तिच्यातून व्यक्त होऊ लागले.
पुढे १८१८ मध्ये स्वराज्याचा अस्त झाला आणि मराठी काव्यही निस्तेज झाले. १८८५ पासुन मात्र पुन्हा एकदा मराठी काव्य जोमाने पुढे आले.

अर्वाचीन मराठी कविता

१८८६ ते १९२० हा कालखंड अर्वाचीन मराठी कवितेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या कालखंडामध्ये मराठी काव्याच्या नव्या युगाची नांदी झाली. या आधीच्या कालखंडात संतकाव्य, पंडिती काव्य आणि शाहिरी काव्य, अशा तीन काव्यधारा होत्या. या तीनही परंपरा हळूहळू क्षीण होत गेल्या. १८८५ च्या सुमारास महाराष्ट्रामध्ये पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव दिसू लागला. व्यक्तिस्वातंत्र्यवाद आणि सौदर्यवाद या दोन महत्त्वाच्या प्रवृत्तींचा संस्कार प्रभावी मराठी मनावर झाला. या सौदर्यवादी जाणिवा वाङ्मयाला पोषक ठरल्या. विशेषत: कवितेवर या सौंदर्यवादाचा मोठा प्रभाव पडला.

१८८५ मध्येच आधुनिक कवितेची चाहूल विष्णु मोरेश्र्वर महाजनींच्या ‘कुसुमांजली’ आणि महादेव मोरेश्र्वर कुंटे यांच्या ‘राजाशिवाजी’ या दोन काव्यांमधून लागली. आशय आणि अभिव्यक्ति या दोनही अंगाने मराठी कवितेचे रुप आमुलग्र बदलणार याची चिन्हे दिसू लागली.

केशवसुत : आधुनिक मराठी कवितेचे जनक

केशवसुतांची पिढी इंग्रजी भाषा शिकलेली, त्या भाषेतील साहित्याने प्रभावित झालेली पहिली पिढी होती. खुद्द केशवसुतांवर कीटस्, शेली, वर्डस्वर्थ यांचा संस्कार झालेला होता.

केशवसुतांच्या आधी मराठी काव्याचे विषय देव-देवता, नीति-अनीती, राजे-राजवाड्यांच्या पराक्रमाचे वर्णन यांपुरतेच मर्यादित होते. संतकाव्यामागील लेखनप्रेरणा मुख्यत: आध्यात्मिक होती. पंडिती कवींनी वैयक्तिक भावभावना वर्ज्य मानल्या होत्या. आणि शाहिरी काव्य राजे-रजवाड्यांच्या स्तुतिपलीकडे पोचत नव्हते. अशा पार्श्र्वभुमीवर केशवसुतांनी ऐहिक विषय; लौकिक भावभावना यांची आपल्या काव्यामधून अभिव्यक्ती केली. भावगीत हेच काव्याचे खरे क्षेत्र आहे हे प्रथमत: केशवसुतांनी दाखवुन दिले. केशवसुतांनी काही महत्त्वाच्या गोष्टी केल्या.
१. विशुद्ध भावगीतात्मक जाणीव                २. प्रणयप्राधान्य भावनेला महत्त्व                    ३. निसर्गप्रेम
४. सामाजिक विचार                               ५.गूढगुंजन                                               ६.सुनीत हा नवा काव्यप्रकार
ह्या भावभावना, हे घटक / विषय, नवे काव्यप्रकार कवितेत समाविष्ट केले. अशी आशय आणि अभिव्यक्ति या दोन्ही बाजुने केशवसुतांनी मराठी काव्यामध्ये बंडखोरी केली. ‘हरपले श्रेय’, ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘झपुर्झा’, ‘स्फुर्ती’, ‘सतारीचे बोल’ - अशा एकाहून एक श्रेष्ठ कविता लिहून त्यांनी आधुनिक मराठी कवितेचे रुप सिद्ध केले. आधुनिक मराठी कवितेतील सर्व प्रवाह - उदा. सामाजिक व राष्ट्रीय कविता, गूढ गुंजनात्मक कविता इत्यादी... केशवसुतांच्यात कवितेपासून सुरू झाल्याचे दिसतात म्हणूनच त्यांना आधुनिक मराठी कवितेचे `जनक' म्हटले जाते.

केशवसुतांच्या काळात नारायण वामन टिळक हे ही एक महत्त्वाचे कवी होते. मात्र आवर्जुन नाव घ्यायला हवे ते बालकवी उर्फ त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे! बालकवींच्या कवितेत सौंदर्यवादाच्या प्रेरणा अतिशय उत्कटपणे एकवटलेल्या आहेत. आत्यंतिक निसर्गप्रेम, दिव्यत्वाची अनावर ओढ, उत्कट आणि प्रगाढ उदासिदनता, चैतन्याचा निजध्यास ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. फुलराणी, खेड्यातील रात्र, उदासिनता, औदुंबर, तडाग असतो, श्रावणमास या त्यांच्या कविता मराठी काव्यामध्ये अजरामर आहेत.

गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी हे देखील आधुनिक मराठी कवितेच्या संदर्भातील महत्त्वाचे नाव आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी होते. अनेक परस्परविरोधी प्रवृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एकवटलेल्या होत्या. अभिजातवाद आणि सौंदर्यवाद यांचे एक चमत्कारिक मिश्रण त्यांच्यामध्ये दिसते. त्यांच्यामध्ये अफाट प्रतिभासामर्थ्य होते यात शंका नाही. विफल प्रीतीची कविता हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणता येईल. विनोद हे त्यांचे आवडते क्षेत्र होते. ‘विहिणींचा कलकलाट’, ‘हुकमे हुकूम’, ‘चिंतातुर जन्तू’, ‘एक समस्या’ अशा काही विनोदी कविता प्रसिद्ध आहेत.

या कवींसोबत कवी दत्त, माधवानुज, रेंदाळकर, बी. नागेश रहाळकर, कृ. ना. आठल्ये, मो. वा कानिटकर, ग.ज.आगाशे, सुमंत, साधुदास या कवींनी आधुनिक मराठी कवितेच्या जडणघडणीस हातभार लावला.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
सावरकरांच्या जीवनात साहित्यनिर्मितीला दुय्यम स्थान असले तरी मराठी काव्यक्षेत्रात त्यांचे नाव कोरले गेलेले आहे. वीररस, देशभक्ती, कल्पनेचे भव्यत्व, विचारप्रधानता, तरल भावुकता इत्यादी दर्शन त्यांच्या काव्यात घडते. सागरास(ने मजसि ने...), माझे मृत्यूपत्र, कमला, गोमंतक अशा कविता प्रसिद्ध आहेत. जयोस्तुते हे स्वातंत्र्यदेवतेचे गीत, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची `जयदेव जयदेव जयजय शिवराय' ही आरती यांवरूनही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्फूर्तिदायी काव्यप्रतिभेची जाणीव आपल्याला होते.

भाग (१) | भाग (२) | भाग (३) 

 इतिहास | भूगोल | महाराष्ट्रातील शेती | उद्योग | तीर्थक्षेत्रे | पर्यटन स्थळे | मराठी भाषेचा इतिहास | साहित्य | संगीत | नाटक | चित्रपट | चित्रकला | शिल्पकला | लोककला | सण - उत्सव | महाराष्ट्र गीते | आपले जिल्हे आपला महाराष्ट्र | ह्यांनी घडविला महाराष्ट्र |