Home    Go to English Website  
   जय महाराष्ट्र! > महाराष्ट्राविषयी विशेष > साहित्य > मराठी कादंबरी
महाराष्ट्राविषयी विशेष
आपले जिल्हे आपला महाराष्ट्र
ह्यांनी घडविला महाराष्ट्र

 


मराठी कादंबरी :

बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली ‘यमुनापर्यटन’ (१८५७) ही मराठीतीलच नव्हे तर हिंदुस्थानातील पहिली कादंबरी समजली जाते. व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधात अनेक प्रश्र्न निर्माण होत असतात. त्यांच्या संदर्भात निश्र्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराला काही सांगावेसे वाटते. ‘यमुनापर्यटन’ या पहिल्याच कादंबरीत अशी कृतिप्रधानता दिसते. तत्कालीन विधवांच्या प्रश्र्नांवर ही कादंबरी भेदक प्रकाश टाकते. हिंदू विधवांना ज्या दिव्यातून जावे लागत असे त्याचे चित्रण नायिका यमुनाच्या दृष्टिकोनातून कादंबरीकाराने अतिशय प्रभावी पद्धतीने केले आहे. बाबा पद्‌मनजींनी सुरू केलेली ही कादंबरीची कृतिप्रधान परंपरा पुढे अनेक कादंबरीकारांनी समर्थपणे चालवली. हरी नारायण आपटे, वामन मल्हार जोशी, साने गुरुजी, विभावरी शिरुरकर, भाऊ पाध्ये, अनंत कदम, दीनानाथ मनोहर इ. लेखकांनी ही परंपरा समृद्ध केली.

मराठी कादंबरी परंपरेतील पुढचे महत्त्वाचे नाव येते ते लक्ष्मणशास्त्री मोरेश्र्वरशास्त्री हळबे यांचे! ‘मुक्तामाला’ (१८६१) ही त्यांची उल्लेखनीय कादंबरी होय. रंजक कथानकातून, वास्तवाच्या आधारे अवास्तव शोधून, त्याची रीतीप्रधान मांडणी करणारी ही कादंबरी परंपरा असल्याचे भालचंद्र नेमाडे म्हणतात. याच परंपरेत पुढे ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, माडखोलकर, पु. भा. भावे, पु.शि. रेगे, चिं. त्र्यं. खानोलकर, रंगनाथ देशपांडे, माधव कानिटकर, चंद्रकांत काकोडकर, योगिनी जोगळेकर, कुसुम अभ्यंकर इत्यादींनी कादंबरीलेखन केले. रा. भि. गुंजीकर यांची ‘मोचनगड’ ही कादंबरी १८७१ मध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीच्या रूपाने मुळात नसलेल्या वास्तवाचा आभास निर्माण करणारी प्रतिकृतिप्रधान कादंबरीची परंपरा निर्माण झाली. गुंजीकर, चिं. वि. वैद्य, नाथमाधव, वि. वा. हडप, रणजित देसाई, वि.स.खांडेकर, मनमोहन नातू, ना.सं.इनामदार, शिवाजी सावंत, गो.नी. दांडेकर, बाबूराव अर्नाळकर, नारायण धारप, श्रीकांत सिनकर अशी ही परंपरा दाखवता येते.

इ.स. १८७४ ते १९२० या काळातील मराठी कादंबर्‍यांची संख्या जवळजवळ सातशे असून ह. ना. आपटे यांच्या पूर्वकाळातील (इ.स. १८८५ पूर्व) बहुतेक कादंबर्‍या अद्भुतरम्य कथानके रंगवणार्‍या होत्या. ‘प्रेमबंधन’, ‘सुवर्णमालिनी’, ‘शृंगारमंजिरी’, ‘मनोरंजक राजहंस व विजया’, ‘मौक्तिकमाला आणि मदनविलास’, ‘पीयूषभाषिणी आणि मदिरामंजिरी’ ही त्या कादंबर्‍यांची नावे सूचक आहेत. 

याच काळात ज्यांचा इंग्रजी भाषेशी व इंग्रजी वाङ्मयाशी परिचय झाला, त्यांच्या कादंबरीलेखनावर इंग्रजी कादंबरीच्या तंत्राचा प्रभाव पडला. रेनॉल्डस या लोकप्रिय कादंबरीकाराच्या कादंबर्‍यांची रूपांतरे-भाषांतरे त्या काळात झाली. उदा. ‘Seemstress’  या कादंबरीचे ‘वज्रेश्वरी अथवा शिवणकाम करणारी’ किंवा ‘Soldier's
Wife
’  चे ‘वीरपत्नी’ हे भाषांतर. 

ह. ना. आपटे यांच्या उदयापूर्वीची एक वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी म्हणून महादेव विठ्ठल रहाळकर यांच्या ‘नारायणराव आणि गोदावरी’ (१८७९) या कादंबरीचा उल्लेख करावा लागतो. रचनेचे कौशल्य, आकर्षक प्रसंग निर्मिती, मनोहर व्यक्तिचित्रे, तसेच स्वाभाविक व वास्तव वातावरण ही या कादंबरीची वैशिष्ट्ये आहेत.

इ.स. १८८५ मध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रवादी विचारांचे वारे देशात वाहू लागले. आगरकर-रानडे-गोखले यांचे सुधारणावादी विचार प्रभाव गाजवू लागले होते. अशा काळात हरिभाऊ आपटे यांच्या सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबर्‍यांची निर्मिती झाली. ‘गणपतराव’, ‘पण लक्षात कोण घेतो?’, ‘मी’ व ‘यशवंतराव खरे’ या चार सामाजिक कादंबर्‍या, आणि ‘उष:काल’, ‘सूर्योदय’, ‘गड आला पण सिंह गेला’ आदी ऐतिहासिक कादंबर्‍यांचे लेखक म्हणून मराठी कादंबरीच्या इतिहासात हरिभाऊंचे कर्तृत्व लक्षणीय आहे. 

हरिभाऊंच्या कादंबर्‍यांमुळे ‘कादंबरी’ या वाङ्मयप्रकाराला महाराष्ट्रात लोकप्रियता लाभली. रसिकांची कादंबरी-वाचनाची भूक भागवण्यासाठी अनेक ग्रंथमाला/पुस्तकमाला या काळात उदयाला आल्या. उदा. मनोरंजक व नीतिपर पुस्तकमाला (१८८९), मनोरंजक ग्रंथप्रसारक मंडळींची पुस्तकमाला (१९०२), भारतगौरव ग्रंथमाला (१९१०) इत्यादी. कादंबरीच्या निर्मितीचे आणि प्रसाराचे फार मोठे कार्य या मालांनी केले. 

ह. ना. आपटे यांच्या नंतरच्या मराठी कादंबरीकारांत नाथमाधव (द्वारकानाथ माधवराव पितळे), वि.सी. गुर्जर, वा. गो. आपटे हे महत्त्वाचे कादंबरीकार होत. ‘सावळ्या तांडेल’, ‘विहंगवृंद’, ‘डॉक्टर कादंबरी’, ‘विमलेची गृहदशा’ ह्या नाथमाधव यांच्या कादंबर्‍यांतून स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, प्रौढविवाह इत्यादी तत्कालीन सामाजिक प्रश्र्नांचा ऊहापोह केलेला आढळतो. मात्र त्यांच्या सामाजिक कादंबर्‍यांपेक्षा ते ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून मराठी वाचकाला परिचित आहेत. ‘स्वराज्याचा श्रीगणेशा’, ‘स्वराज्याची घटना’ ह्या त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. वि.सी. गुर्जर यांच्या ‘देवता’, ‘शशांक’, ‘जीवनसंध्या’, ‘असार संसार’ वगैरे बंगाली कादंबर्‍यांची भाषांतरे प्रसिद्ध आहेत. वा. गो. आपटे यांनीही बंगाली कादंबर्‍यांची मराठी रूपांतरे केली आहेत. त्यांनी संपूर्ण बंकिमचंद्र मराठीत आणले!

त्या वेळच्या महाराष्ट्रातला स्त्रीवर्गही काही प्रमाणात वाङ्मयनिर्मिती करण्याइतका शिक्षित आणि जागृत झाला होता. हरिभाऊंच्या समकालीन काशीताई कानिटकर यांची ‘रंगराव’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली.

ना. ह. आपटे यांनीही अनेक सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिल्या. त्यांपैकी ‘वैभवाच्या कोंदणात’, ‘भाग्यश्री’, ‘याला कारण शिक्षण’, ‘पहाटेपूर्वीचा काळोख’ आदी विशेष उल्लेखनीय आहेत. समाजप्रबोधनाची तळमळ आणि प्रामाणिकपणा यांचा प्रत्यय त्यांतून येतो. 

तंत्रात्मक कौशल्याने लोकप्रियता मिळवणार्‍या कादंबर्‍या या काळात मोठ्या प्रमाणावर लिहिल्या गेल्या. तंत्रदृष्ट्या सदोष भासणारी पण तात्त्विक, वैचारिकदृष्ट्या महत्त्वाची अशी ‘रागिणी’ ही कादंबरी वामन मल्हार जोशी यांनी लिहिली. पुस्तकरूपाने ती प्रसिद्ध होण्यापूर्वी ‘मासिक मनोरंजन’ मधून १९१४ साली ती क्रमश: प्रसिद्ध झाली. ‘रागिणी’ मुळे मराठीत तत्त्वचर्चात्मक कादंबरीचा उदय झाला. त्यानंतर वामन मल्हारांनी ‘आश्रमहरिणी’ (१९१६), ‘नलिनी’ (१९२०) या कादंबर्‍या लिहिल्या. स्त्री-स्वातंत्र्याचा आग्रहाने पुरस्कार करणारी निर्भय, बुद्धिमान नायिका त्यांनी रंगवली. तत्कालीन महत्त्वाच्या अनेक सामाजिक प्रश्र्नांना या कादंबर्‍यातून स्थान मिळाले. ‘सुशीलेचा देव’, ‘इंदू काळे व सरला भोळे’ या कादंबर्‍यांतून त्यांनी मराठी कादंबरीला नवे तांत्रिक सौंदर्य प्राप्त करून दिले. प्रगतिशील सामाजिक तत्त्वज्ञानाच्या पुरस्काराच्या दृष्टीने वामन मल्हारांच्या कादंबर्‍यांना साहित्याच्या इतिहासात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. मुख्यत: स्त्रीजीवनविषयक प्रश्र्न सहानुभूतीने मांडण्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे. परंपरागत रूढ समजुतींच्या चौकटीत होणार्‍या कुचंबणेतून बाहेर पडण्यासाठी धडपडणारी नवी स्त्री त्यांनी चित्रित केली. विशेषत: ‘सुशीलेचा देव’ (१९३०) या कादंबरीत सुशीलेच्या रूपाने नव्या स्त्रीचे मोठे विलोभनीय, स्पृहणीय असे दर्शन त्यांनी घडवले.

कादंबरीच्या प्रयोजनासंबंधी आणि कादंबरीलेखनाच्या पद्धतीसंबंधी स्वत:चे असे खास व ठाम तत्त्वज्ञान असलेले ना.सी. फडके हे मराठीतील अतिशय लोकप्रिय कादंबरीकार. १९२५ साली ‘कुलाब्याची दांडी’ ही कादंबरी त्यांनी लिहिली. तेव्हापासून जवळपास सत्तर कादंबर्‍यांची निर्मिती त्यांनी केली. विस्मयाचे सौम्य धक्के देणारी, वाचकाचे कुतूहल सतत जागे ठेवणारी कथानकाची गुंफण, कलात्मक-प्रत्ययकारी व रेखीव पात्रदर्शन, ‘अगदी खरेखुरे वाटावे’ असे संवाद आणि भाषाशैलीतील लाडिकपणा या गुणविशेषांमुळे फडके लोकप्रिय कादंबरीकार ठरले. ‘अटकेपार’, ‘दौलत’, ‘जादूगार’, ‘उद्धार’, ‘निरंजन’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबर्‍यांच्या अनेक आवृत्या निघाल्या. 

फडके यांचेच समकालीन असे मराठीतील दुसरे कादंबरीकार म्हणजे वि.स.खांडेकर होत. `हृदयाची हाक' ही त्यांची पहिली कादंबरी १९३० साली प्रकाशित झाली. नंतर ‘कांचनमृग’, ‘दोन ध्रुव’, ‘उल्का’, ‘हिरवा चाफा’, ‘दोन मने’, ‘क्रौंचवध’, ‘अमृतवेल’, ‘ययाति’ अशा एकाहून एक सरस कादंबर्‍यांतून त्यांनी ध्येयवादी नायक आणि त्यागी, सुंदर नायिका रंगवल्या. त्यांच्या कादंबर्‍यांतून दीनदलितांबद्दल त्यांना अंत:करणापासून वाटणारा जिव्हाळा आणि स्वार्थत्यागसंपन्न जीवनाविषयी वाटणारी ओढ व्यक्त होते. त्यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आणि वि. स. खांडेकर हे मराठी साहित्यातील पहिले ‘ज्ञानपीठ’ विजेते साहित्यिक ठरले. फडके-खांडेकर, यांच्याबरोबर ग.त्र्यं. माडखोलकर हे प्रथितयश कादंबरीकार होत. ‘मुक्तात्मा’, ‘नवे संसार’, ‘स्वप्नांतरिता’, ‘नागकन्या’, ‘भंगलेले देऊळ’, आदी कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. यशस्वी नाटककार म्हणून नाव मिळवलेल्या भा. वि. वरेरकर तथा मामा वरेरकर यांच्या ‘विधवाकुमारी’, ‘धावता धोटा’ या कादंबर्‍या विशेष गाजल्या. या कादंबर्‍यांतून वरेरकरांनी सामाजिक मराठी कादंबरीतील वास्तवतेला अधिक व्यापक स्वरूप दिले. गिरणगावांतील मजुरांच्या कष्टमय जीविताचे चित्रण त्यांनी मराठीत प्रथम केले.

भाग (१) | भाग (२) | भाग (३) 

 इतिहास | भूगोल | महाराष्ट्रातील शेती | उद्योग | तीर्थक्षेत्रे | पर्यटन स्थळे | मराठी भाषेचा इतिहास | साहित्य | संगीत | नाटक | चित्रपट | चित्रकला | शिल्पकला | लोककला | सण - उत्सव | महाराष्ट्र गीते | आपले जिल्हे आपला महाराष्ट्र | ह्यांनी घडविला महाराष्ट्र |