Home    Go to English Website  
   जय महाराष्ट्र! > महाराष्ट्राविषयी विशेष > संगीत > मराठी नाट्यसंगीत - एकमेवाद्वितीय परंपरा
महाराष्ट्राविषयी विशेष
आपले जिल्हे आपला महाराष्ट्र
ह्यांनी घडविला महाराष्ट्र

 

कंठसंगीत | भावसंगीत | नाट्यसंगीत

मराठी नाट्यसंगीत - एकमेवाद्वितीय परंपरा :

प्रस्तावना :
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, एकच प्याला ...अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता. संगीत नाटकांच्या इतिहासातील काळाचे टप्पे हे समीक्षकांनी व अभ्यासकांनी पुढीलप्रमाणे मानले आहेत.
किर्लोस्कर, देवल काळ - १८८० -१९१०
खाडीलकर, बालगंधर्व काळ - १९१० - १९३०
अत्रे, रांगणेकर काळ - १९३० - १९६०
गोखले, कानेटकर काळ - १९६० - १९८०

नाटककार, संगीतकार, गायक-अभिनेते :
अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाऴ देवल, कृ. प्र. खाडीलकर, राम गणेश गडकरी, मामा वरेरकर,आप्पा टिपणीस, वीर वामनराव जोशी, वसंत शांताराम देसाई, प्र. के. अत्रे, गोविंदराव टेंबे, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री. कृ. कोल्हटकर, वि. सी. गुर्जर, विद्याधर गोखले, विश्राम बेडेकर, तात्यासाहेब केळकर, माधवराव पाटणकर, ह. ना. आपटे, माधवराव जोशी, मो. ग. रांगणेकर, वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, नागेश जोशी, बाळ कोल्हटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर असे अनेक नाटककार आणि पद्यरचनाकार संगीत नाटकांना विविध कालखंडात लाभले. १९६० नंतर शांता शेळके यांनी हे बंध रेशमाचे, धाडीला राम तिने का वनी, वासवदत्ता अशा काही संगीत नाटकांसाठी गीते लिहिली.

गायनाचार्य भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव, पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, केशवराव भोळे असे दिग्गज संगीतरचनाकार (संगीतकार) लाभल्याने मराठी नाट्यसंगीत समृद्ध झाले. यातील प्रत्येक संगीतरचनाकार स्वतः उत्तम गायक होते. हिंदुस्थानभर भ्रमण करून संगीताचे ज्ञान आणि संस्कार त्यांनी आत्मसात केल्याने, त्याचे प्रतिबिंब नाट्यसंगीतात पडणे स्वाभाविक होते. उदाहरणार्थ ‘मानापमान’ नाटकातील अनेक चाली बनारस, लखनौ तसेच पंजाब येथील उपशास्त्रीय गायनप्रकारांवर बेतलेल्या आहेत. तसेच ‘स्वयंवर’ मधील अनेक पदे मूळ बंदिशींवर आधारली आहेत.

नाट्यसंगीताचा विचार करताना काही बुजुर्ग गायक - कलाकारांचा उल्लेख अनिवार्य आहे. बालगंधर्व, भाऊराव कोल्हटकर, संगीतसूर्य केशवराव भोसले, मोरोबा वाघोलीकर, मा. दीनानाथ मंगेशकर, नानासाहेब जोगळेकर, शंकरराव सरनाईक, माधवराव वालावलकर, मा. अविनाश, छोटा गंधर्व, भालचंद्र पेंढारकर, वसंतराव देशपांडे, जयराम, जयमाला आणि कीर्ती शिलेदार, राम मराठे, प्रसाद सावकार, रामदास कामत, फैय्याज, प्रकाश घांग्रेकर, रजनी जोशी, मधुवंती दांडेकर, सुहासिनी मुळगावकर आदी कलाकारांनी आपल्या गायनाचे आणि अभिनयाचे अनेक रंग नाट्यसंगीताला दिले.

दरम्यान अभिजात शास्त्रीय संगीत गाणारे मोठे कलाकारही मैफिलीत नाट्यसंगीताचा समावेश करू लागले. उस्ताद अब्दुल करीम खॉं, सवाई गंधर्व, पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, ज्योत्स्ना भोळे, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, पं. राम मराठे, विनायकबुवा पटवर्धन, मा. कृष्णराव, निवृत्तीबुवा सरनाईक, मा. दीनानाथ मंगेशकर, मालिनी राजूरकर अशी अनेक शास्त्रीय गायकांची नावे सांगता येतील. नाट्यसंगीत सर्व स्तरांत लोकप्रिय करण्याचे काम या कलाकारांनी केले.

नाट्यसंगीताच्या क्षेत्रातील वादक साथीदारांचा उल्लेख करणेही गरजेचे आहे. ऑर्गन, हार्मोनियम, सारंगी, तबला, पखवाज, व्हायोलीन ही वाद्ये नाट्यसंगीतासाठी प्रामुख्याने उपयोगात आणली जातात. बालगंधर्वांच्या काळात उस्ताद कादरबक्ष (सारंगी), उस्ताद थिरखवॉं (तबला) हे साथीदार प्रसिद्ध होते.

विविध सांगीतिक आकृतिबंध :
भारतीय संगीत परंपरेतील विविध ससांगीतिक आकृतिबंध नाट्यसंगीतातून प्रत्ययास येतात. ध्रुवपद - धमारापासून ते गजल -कव्वालीपर्यंत आणि भावगीतापर्यंत हे वैविध्य दिसते. ख्याल, तराणा,ठुमरी, कजरी, होरी, चैती, गजल, कव्वाली, लावणी, साकी, दिंडी, आर्या, अभंग, स्त्रीगीते असे अनेक प्रकार नाट्यसंगीतातून मुक्तपणे वापरलेले दिसतात.

किर्लोस्करी नाटकांतील संगीतावर कर्नाटकातील यक्षगानाचा प्रभाव होता. महाराष्ट्रातील कीर्तनपरंपरेचे व लोकसंगीताचे अंश (दिंडी, साकी, लावणी), जयदेवांच्या गीतगोविंदाचे प्रतिबिंब, आणि शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायला जाणारा टप्पा हा प्रकारही नाट्यगीतांत वापरलेला दिसतो.

नाट्यसंगीतामुळे वेगवेगळ्या रागांचा प्रसार झाला. नाथ हा माझा (यमन), आनंदे नटती (मल्हार), उगवला चंद्र पुनवेचा (मालकंस), कठीण कठीण किती, पुरुष हदय बाई (यमनकल्याण), कटु योजना ही विधीची (शंकरा), अनृतचि गोपाला (सूरदासी मल्हार), एकला नयनाला विषय तो झाला (पहाडी), कृष्ण माझी माता (बागेश्री), कोण अससी तू नकळे मजला (जोगकंस), खरा तो प्रेमा (पहाडी - मांड), गुरू सुरस गोकुळी (जयजयवंती), जय गंगे भागीरथी (कलावती), जय शंकरा गंगाधरा (अहिरभैरव), जयोस्तुते उषादेवते (देसकार), झणी दे कर या (अडाणा), तळमळ अति अंतरात (सोहनी) अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील. याशिवाय अनेक संतरचना नाट्यसंगीत म्हणून वापरल्या गेल्या आणि विविध रागांत त्यांची अनेक रूपे रसिकांच्या मनात ठसली. अवघाची संसार सुखाचा करीन (धानी), अगा वैकुंठीच्या राया (भैरवी), अमृताहुनी गोड, देवा धरिले चरण (भीमपलास), देवा तुझा मी सोनार (जौनपुरी) या नाट्यगीतांचा उल्लेख या संदर्भात करता येईल.

नाट्यसंगीताचे अनेक प्रवाह विविध कालखंडांत निर्माण झाले, त्यांना रसिकाश्रय लाभला. किर्लोस्करी काळातील नाट्यसंगीतावर कीर्तन परंपरेचा प्रभाव होता. घरगुती पण वास्तववादी अशी ही नाटके होती. विषयही बहुधा पौराणिक असत. उदा. शाकुंतल, सौभद्र, द्रौपदी, सावित्री, मेनका, आशानिराशा, रामराज्यवियोग, विधिलिखित. त्यानंतर देवलांच्या ‘शारदा’ ने अतिशय सोपी, सहज पण प्रासादिक पदे नाट्यसंगीतात आणली. त्यात माधुर्य होते आणि जिव्हाळाही होता. शिवाय एक सामाजिक भानही या पदांमध्ये होते. उदा. शारदा, संशयकल्लोळ, मृच्छकटिक या नाटकांतील रचना. कृ. प्र. खाडिलकरांची पदे ओजोगुणयुक्त आणि आदर्शवादी आहेत. हे स्वयंवर, मानापमान, विद्याहरण, द्रौपदी, मेनका, त्रिदंडीसंन्यास यातील नाट्यपदे ऐकल्यानंतर लक्षात येते. सुभाषितांचे मोल यातील काही पदांना मिळाले, हेही एक वैशिष्ट्य मानावे लागेल. स्वकुलतारक सुता, मी अधना न शिवे भीती मना, शूरा मी वंदिले, प्रेमसेवा शरण, तव जाया नृपकन्या ही ‘सुभाषितांची’ उदाहरणे होत. किर्लोस्कर, खाडीलकर, देवल यांच्यापेक्षा निराळा बाज गडकरी, सावरकर, वरेरकर, जोशी, रांगणेकर यांनी नाट्यगीतांतून पुढे आणला. नाट्यपदांची रचना अधिक काव्यमय, सोपी, गायनानुकूल झाली. नाट्यपदांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली. हा बदल रसिकांनाही भावला.

गंधर्वोत्तर काळातील प्रतिभासंपन्न नाट्य-संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांनी मराठी संगीत नाटकातील संगीतात लक्षवेधक प्रयोग केले. नाट्यपदांची अ-विस्तारक्षमता (विस्ताराला अतिरेकी वाव नसणारी बांधीव रचना) आणि स्वतंत्र स्वररचना ( बंदिशींवर आधारीत नव्हे तर स्वतंत्र चाली बांधल्या) ही वैशिष्ट्ये जपत अभिषेकींनी नाट्यसंगीत आटोपशीर केले. भावगीतांचा सुंदर वापर (उदा. गर्द सभोती रानसाजणी, अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा, सर्वात्मका सर्वेश्वरा,) तसेच अनवट रागांचा वापर (उदा. सालगवराळी, धानी, बिहागडा) त्यांनी नाट्यसंगीतात केला. शहाशिवाजी, नेकजात मराठा, संन्यस्तखड्ग, कट्यार काळजात घुसली, मेघमल्हार, मदनाची मंजिरी, मंदारमाला, जय जय गौरीशंकर, पंडितराज जगन्नाथ, सुवर्णतुला, स्वरसम्राज्ञी - ही संगीत नाटकांची सूची पाहिली असता संगीतामुळे नाटक किती उत्कट व प्रभावी बनू शकते याचा प्रत्यय आपल्याला येतो.

अन्य माहिती :
काही वेळा संगीत नाटकापेक्षा त्यातील पदांच्या ध्वनिमुद्रिकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. उगवला चंद्र पुनवेचा (बकुळ पंडित), ऐसा महिमा प्रेमाचा (रतिलाल भावसार), काटा रुते कुणाला (अभिषेकीबुवा), गुलजार नार ही मधुबाला (वसंतराव देशपांडे), दान करी रे (रामदास कामत), मर्मबंधातली ठेव ही (प्रभाकर कारेकर), मधुमीलनात या विलोपले (आशा भोसले), मानसी राजहंस पोहतो (ज्योत्स्ना भोळे) अशा नाट्यपदांच्या ध्वनिमुद्रिका अतिशय लोकप्रिय झाल्या आणि आजही आहेत. लोकप्रिय ध्वनिमुद्रिकांची असंख्य उदाहरणे देता येतील.

शाकुंतल, सौभद्र या नाटकांच्या काळात नाटकांतील पदांची सं‘या भरघोस होती. त्यामुळे नाटके रात्रभर चालत असत. बोलपटांच्या आगमनाने दोन-तीन तासांची कमरणूक सहज उपलब्ध झाल्याने संगीत नाटकांची गरज कमी होत गेली. तसेच या काळात संगीत नाटकाने बदलत्या काळाशी जुळवून घेणे नाकारल्याने नाट्यसंगीतही मागे पडत गेले. ‘नाट्यमन्वंतर’ या नाट्यसंस्थेच्या कुलवधू, आंधळ्यांची शाळा, भूमिकन्या सीता आदी नाटकांनी १९४० च्या दशकात काही बदल करून आटोपशीर नाट्यसंगीत रसिकांसमोर आणले. त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला. पण बोलपटांचे आक्रमण इतके प्रभावी होते की जवळपास १९६० - ६५ पर्यंत नाट्यसंगीताला आणि संगीत नाटकाला डोकेही वर काढता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.या स्थितीतही संगीत नाटके सातत्याने सादर करणार्‍या काही निष्ठावान नाटक मंडळींचा उल्लेखही या क्षेत्राच्या इतिहासात होणे आवश्यक आहे. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक कंपनी, ललितकला, नूतन संगीत मंडळी, मराठी रंगभूमी, नाट्यमन्वंतर, राजाराम संगीत मंडळी आदी नाटक मंडळींनी अनेकानेक संगीत नाटकांची निर्मिती केली, सर्वत्र या नाटकांचे प्रयोग केले, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत संगीत नाटकांची व नाट्यसंगीताची परंपरा जपली.

नाट्यसंगीताच्या विचारात संयुक्त नाट्यप्रयोगांचा संदर्भही महत्वाचा आहे. ललितकलाचे केशवराव भोसले आणि गंधर्व नाटक कंपनीचे बालगंधर्व यांच्या ‘संयुक्त मानापमान’ चा प्रयोग टिळक स्वराज्य फंडासाठी मुंबईत दिनांक ८ जुलै, १९२१ रोजी झाला. सायंकाळी साडेसात ते पहाटे अडीचपर्यंत रंगलेल्या या प्रयोगाचे तिकिटाचे दर अडीच रुपयांपासून शंभरपर्यंत होते. चार तासांत सर्व तिकिटे संपली होती. या अभिनव प्रयोगाची तिकिट विक्री त्या काळात धारवाडपासून कोलकत्यापर्यंत तारेने झाली होती. पंधरा हजार तीनशे रुपये असे विक्रमी उत्पन्न या प्रयोगातून झाले. याच संचाचा संगीत सौभद्रचा संयुक्त प्रयोग दिनांक २२ जुलै, १९२१ या दिवशी झाला. त्याचे उत्पन्न नऊ हजार रुपये झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या अकाली निधनाने हे अभिनव प्रयोग बंद पडले.

गायन आणि अभिनय या दोन्हींत तयार असणारे कलाकार ही आदर्श संगीत नाटकाची गरज आहे. चांगले संगीत नाटक लिहिणारे लेखक पुढे येणे आवश्यक आहे. नाट्यसंगीताला एक परंपरागत असे व्यक्तिमत्त्व आहे. आधुनिकता कितीही आली, तरी हे व्यक्तिमत्त्व अबाधित राहायला हवे. कारण ती आपली एकमेवाद्वितीय अशी परंपरा आहे. नाट्यसंगीताचे व्यक्तिमत्त्व राखत, आजही अनेक नाट्यसंस्था, गायक-अभिनेते कलाकार या क्षेत्रात निष्ठेने कार्य करीत आहेत. नाट्यसंगीताला जगात तोड नाही.

नाट्यसंगीताच्या प्रवाहाने अनेक बदल अनुभवले. सारे संगीतप्रकार सामावून घेत, स्वतःचे रंग त्यात मिसळून, आधुनिक काळाची आव्हाने स्वीकारत संगीत नाटक आणि त्यातील नाट्यसंगीताची वाटचाल आजही सुरू आहे. निर्मितीचा वेग मंदावला असला, तरी नाट्यसंगीताची लोकप्रियता आजही टिकून आहे आणि टिकून राहील कारण त्याचा पाया अभिजात संगीताचा आहे.

संगीत रंगभूमीवरील काही महत्त्वाचे कलाकार व त्यांचा संक्षिप्त परिचय. :
गायनाचार्य भास्करबुवा बखले
- अभिजात संगीतातील सर्वसंचारी आणि श्रेष्ठ दर्जाचे गवई.
- ' स्वयंवर ' नाटकातील चालींमुळे नाट्यसंगीतातही अभिजात राग परिचित झाले.
- उठावदार मुखडा आणि आकर्षण बांधणीच्या दुर्मीळ चाली बुवांनी नाट्यसंगीतात आणल्या.
- नाथ हा माझा, स्वकुलतारकसुता, मम आत्मा गमला, सुजन कसा मन चोरी, मम सुखाची ठेव आदी पदे यमन, भूप, बिहाग, भीमपलास, बागेश्री, तिलककामोद आदी रागांत होती. त्यांनी श्रोत्यांची पकड घेतली, जी आजही कायम आहे.
- गोविंदराव टेंबे, बालगंधर्व, मा. कृष्णराव ही नाट्यसंगीतातील कर्तृत्ववान शिष्यांची पिढी बुवांनी घडवली. 

गोविंदराव टेंबे
- जन्म - १८८१, मृत्यू - १९५५
- प्रसिद्ध हार्मोनियमवादक, संगीतकार, नट, नाटककार, नाटकमंडळीचे मालक, पद्यकार...अशा अनेक भूमिकांतून परिचित व्यक्तिमत्त्व. पण हार्मोनियमवादक म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध.
- मानापमान, विद्याहरण यातील पदांना वेगळ्या चाली योजून नाट्यसंगीतात त्यांनी क‘ांती घडवली.
- अभिजात संगीतात त्यांनी पूरबी अंगाचे संगीत मिसळले आणि ‘नाही मी बोलत’, ‘सवतची भासे मला’, ‘भाली चंद्र असे धरीला’, ‘मी अधना’ अशी उत्तमोत्तम नाट्यपदे जन्माला आली. त्यांची मोहिनी आजही टिकून आहे.
- उत्तम, रसाळ लेखन हेही त्यांचे वैशिष्टय होते. ‘माझा संगीतव्यासंग’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले. त्यांनी उत्तम संगीतिका (ऑपेरा) लिहिल्या आणि बसवल्या.

मा. दीनानाथ मंगेशकर
- जन्म - २९ डिसेंबर, १९००, मृत्यू - २४ एप्रिल, १९४२
- केवळ ४२ वर्षांचे आयुष्य पण प्रचंड कर्तृत्व,
- गोव्याच्या भूमीत जन्मलेल्या दीनानाथांनी बाबा माशेलकर, रामकृष्णबुवा वझे, निसार हुसेन, बखलेबुवा, गणपतीबुवा भिलवडीकर, इस्माईलखॉं, अब्दुलखॉं अशा अनेकांचे मार्गदर्शन घेऊन स्वतःची गायकी घडवली आणि समृद्ध केली.
- त्यांनी प्रथम उर्दू नाटकातून भूमिका व पदे गाजवली. १९१८ ते १९४० या काळात त्यांनी कलाकारकीर्द गाजवली.

(भाग २) 

 इतिहास | भूगोल | महाराष्ट्रातील शेती | उद्योग | तीर्थक्षेत्रे | पर्यटन स्थळे | मराठी भाषेचा इतिहास | साहित्य | संगीत | नाटक | चित्रपट | चित्रकला | शिल्पकला | लोककला | सण - उत्सव | महाराष्ट्र गीते | आपले जिल्हे आपला महाराष्ट्र | ह्यांनी घडविला महाराष्ट्र |